मतदार नक्की कोण आहेत? सूज्ञ, मूर्ख,लाचार की बावळट? हा प्रश्न आज अत्यंत प्रकर्षाने पडण्याचं कारण म्हणजे राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणूकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेतेमंडळींनी जी एकमेकांविषयी गरळ ओकली आहे ती पाहता ही मंडळी मतदारांना मूर्ख तरी समजत असावीत किंवा बावळट तरी समजत असावीत असे समजण्यास बराच वाव आहे.आपण एकमेकांचे वस्त्रहरण करू म्हणजे मतदार,ज्यांना जाहीर भाषणात ’सूज्ञ’ संबोधले जाते,ते आपल्यावर ,आपल्या तथाकथीत स्पष्टवक्तेपणावर विश्वास ठेवतील आणि आपल्या विरोधकांना नामोहरम करतील आणि आपण सत्तेवर येऊ असे त्यांना वाटत असावे. आणि म्हणूनच आजच्या घडीला मतदारांवर, म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांवर मोठी जबाबदारी आहे,हे लक्षात घ्यायला हवे.
गेल्या दहा-पंधरा दिवसातील वर्तमानपत्रे जर तुम्ही अगदी ढोबळमानाने जरी वाचली असतील किंवा अगदी जाता-जाता म्हणून जरी दूरचित्रवाणीवरील वाहिन्या पाहिल्या असतील तरी तुमच्या लक्षात आले असेल की,जी मंडळी सणासूदीला किंवा ’आपण दिवाळी कशी साजरी करता’ या सारख्या अत्यंत फुटकळ प्रश्नावर प्रतिक्रीया देण्यासाठी उपलब्ध असायची ती मंडळी आज घाऊक बाजारात उभे असावे तसे उठ सूठ सर्व वाहिन्यांना मुलाखती देत सुटली आहेत.हे सर्व पाहील्यानंतर तुम्हाला काय वाटते? कशामुळे हे घडले असावे? मतदार खरेच ’राजा’ आहे,म्हणून असे घडले असावे? नाही. यामागे खरे कारण हे आहे की,आण्णा हजारे यांनी या सहा महीन्यात भ्रष्टाचार विरोधी जे वातावरण निर्माण केले आहे त्याने ही नेतेमंडळी धास्तावली आहेत,हे आहे.कदाचित मी हे जे म्हणतो ते अनेकांना पटणार नाही.कारण आणांच्या आंदोलनाला जनजागृतीचे श्रेय देणं अनेकांना जड जातं.कदाचित तसे केल्यास आपण बुरसटलेल्या विचारांचे ठरवले जाऊ अशी भिती त्यांना वाटत असावी.पण तुमच्या माझ्या सारख्या सर्व सामान्य़ मतदाराला आण्णांना आणि त्यांच्या आंदोलनाला श्रेय न देण्याचे काहीच कारण नाही. थोडक्यात सांगायचे तर भ्रष्टाचाराने बरबटलेले हे नेते मनातून घाबरले आहेत.अशा परिस्थितीत मतदारांनी आपल्यावरील जबाबदारी ओळखायला हवी.त्याचप्रमाणे आपल्या मताचे मोल समजून घ्यायला हवे आणि ते मोल मतपेटीतून व्यक्त व्हायला हवे.
या निवडणूकीच्या निमित्ताने अजित पवारांनी मुंडें,राणे यांचे घोटाळे बाहेर काढले आणि आमचे तोंड उघडायला लावू नका म्हणून बजावले.राणे यांनीही अशीच धमकी दिली. थोड्याफार फरकाने भुजबळ,राज ठाकरे,उध्दव ठाकरे यांनी हेच केले.कोणी किणी प्रकरणाकडे बोट दाखवले तर कोणी तेलगी प्रकरणाकडे बोट दाखवले. हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटत नाही,ही सर्व मंडळी गुन्हेगार आहेत आणि सत्ताप्राप्तीतून मिळणारे आधिकार जनतेच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याऐवजी एकमेकांना ब्लकमेल करून स्वतच्या गुन्ह्यांवर पांघारून घालत आहेत.या सर्व नेत्यांना जर खरोखरच जनतेची,या देशाची काळजी असेल ,या देशाचे भले व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी त्यांच्याकडे असलेली गुन्हेगारांची माहीती पोलीसांना द्यायला हवी.किंवा या गुन्हेगारांना न्यायालयात खेचायला हवे.पण तसे घडत नाही.कारण सगळेच चोर.कोणी तिहार मधून सुटलेले,कोणी त्या वाटेवर असलेले तर कोणी पुराव्या अभावी ताठ मानेने समाजसेवक म्हणून वावरणारे.आणि म्हणूनच आता आपणच सावध होऊन आपले मत विचारपूर्वक द्यायला हवे. मला माहीत आहे ,आपल्याला निवड करायची आहे ती-वाईट,खूप वाईट आणि टाकाऊ यांच्यातून .पण जोवर आपल्याला उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळत नाही तोवर तरी याला पर्याय नाही.त्यामुळे आपण आपला हक्क बजावायला हवा.आणि आपण खरोखरच सूज्ञ आहोत हे सिध्द करायला हवे.अन्यथा ’सुज्ञ’ ही शिवी ठरेल.ती तशी ठरवायची का हे ठरविण्याची वेळ आता आली आहे.

